(समीर खान)
अकोला- छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य न भूतो न भविष्यतो असून शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर राज्यातील सर्व धर्माच्या व जाती जमातीच्या रयतेचे राजे होते.त्यांच्या संदर्भात ते मुस्लिम विरोधी होते असे म्हटल्या जाते, मात्र यामध्ये काहीच तथ्य नसून ही स्वार्थी राजकीय परिभाषा असून मुस्लिम युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म प्रेमाच्या तत्त्वाचा अभ्यास करून त्यांच्याविषयी होत असणारा हा अपप्रचार थांबवण्याचे आवाहन जळगाव येथील व्याख्याते सय्यद अली अंजुम रजवी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सुभाष चौक परिसरातील मेमन टॉवर येथे अली रजवी यांचे सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्यानात मुस्लिम कार्यकर्ते व नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवीत या व्याख्यानाचा लाभ घेतला. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे महानगर अध्यक्ष अब्दुल अनिस यांनी साकार केलेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख होते. गत वीस वर्षापासून काही तत्व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मुस्लिम विरोधी दर्शवित आहे.
तसेच कथा कादंबऱ्यांमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कर्दनकाळ म्हणून दाखविल्या जाते, मात्र यामध्ये विशिष्ट राजकीय शक्ती वावरत असून हिंदू मुस्लिम समाजात दुही माजविण्यासाठी छत्रपतींचा खोटा इतिहास समाजापुढे मांडण्यात आला आहे. मात्र अलीकडे अनेक संशोधक व लेखकांनी छत्रपतींचा खरा इतिहास हा समाजासमोर मांडून छत्रपती शिवराय हे मुस्लिम विरोधी नसून ते स्वराज्य स्थापनेसाठी मुस्लिम शासकांच्या विरोधात होते ही बाब आता समोर आणली आहे
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाचे पाईक होते. छत्रपतींना मुस्लिम हे हिंदू प्रमाणे तितकेच प्रिय होते. त्यांच्या आरमार व सैन्यात तब्बल 30 हजार मुस्लिम सैनिक स्वराज्याचे रक्षण करीत होते.सिद्धी हीलाल, काझी हैदर ,इब्राहिम सिद्धीकी, मदारी मेहतर आणि अफजलखानाचा वध करण्यासाठी महाराजांना वाघ नखे देणारा रुस्तम जमा सारखे एकनिष्ठ छत्रपतींची थोरवी गाऊन स्वराज्याची सेवा करीत होते .इतकेच नव्हे छत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सुफी संतांचे शिष्य होते.ते शहा शरीफ या सुफी संतांना आपले गुरु मानित असत.
त्यांच्या नावावरूनच त्यांचे पुत्र शहाजीराजे व शरीफ राजे यांचे नामकरण झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज ही उपाधी संत तुकाराम महाराजांनी देऊन त्यांच्या कार्याची थोरवी गायली. इतकेच नव्हे तर छत्रपतीच्या सर्वधर्म समभावाच्या संदर्भात रायगडावर मुस्लिम सैनिकांना नमाज पडता यावी यासाठी मशिदची पण निर्मिती महाराजांनी करून आपल्या सर्वधर्मसमभावाची संकल्पना सातत्याने जोपासली. आपल्या या व्याख्यानात सय्यद अली अंजुम यांनी महाराजांचा देशभक्तीचा इतिहास सादर करीत मुस्लिम समाजाने छत्रपतींचा इतिहासाचे वाचन करून समाजात त्यांच्याविषयीचा मुस्लिम विरोधी दुराग्रह दूर करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम कविवर्य नईम फराज यांनी नात पाक सादर केला.
यावेळी कच्ची मेमन जमात चे अध्यक्ष जावेद जकारीया यांनी प्रास्ताविक करून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची संकल्पना मांडली. तर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष विजयराव देशमुख यांनी पक्षाच्या वतीने शिवस्वराज सप्ताह अंतर्गत हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती देत अशा उपक्रमाची उपयुक्तता प्रतिपादित केली. संचालन बुडन गाडेकर यांनी तर आभार राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाचे महानगर अध्यक्ष अब्दुल अनीस यांनी मानलेत. यावेळी माजी नगरसेवक, मनोज गायकवाड,गौतम गवई, फय्याज खान, रहीम पेंटर,दिलीप देशमुख, अफसर कुरेशी,याकूब पहेलवान, युवक महानगर अध्यक्ष अजय मते,यश सावल, ओबीसी सेलचे महानगर अध्यक्ष अनिल मालगे, अविनाश इंगले,ताज नौरंगाबादी, गजानन मुरूमकार, युनूस रेघीवाले, वैभव घुगे,अज्जू कप्तान,मोहम्मद फिरोज, आकाश धवसे , शेख मुस्ताक, सोनू पठाण ,नाजीम,प्रकाश खंडारे आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.