शहिद स्मारक दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोला, दि. १० : देशासाठी आहुती देणाऱ्या शहिद व सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी शहरात शहिद स्मारक निर्माण झाले आहे. ते आपणा सर्वांना व येणाऱ्या पिढ्यांनाही दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
अकोला शहरातील वॉर टॅंक व हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण श्री. विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, स्वातंत्र्य सैनिक विलासजी मुंजे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त कविता द्विवेदी आदी उपस्थित होते.
देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती गौरव म्हणून शहरात शहीद स्मारक निर्माण झाले आहे. सर्वांना प्रेरणादायी ठरणारी अशी स्मारके गावोगाव निर्माण व्हावीत, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
शहरातील अनेक मान्यवर, माजी सैनिक यावेळी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी यावेळी माजी सैनिक व उपस्थितांशी संवाद साधला.