महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी ‘अमृत’ संजीवनी!

उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस

अकोला मार्गे ‘उधना-ब्रह्मपूर अमृत भारत’ एक्सप्रेसचा शुभारंभ

ॲड. अमोल इंगळे
अकोला, २७ सप्टेंबर: अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ‘उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस’ अकोला स्थानकावरून मोठ्या थाटात धावली. या महत्त्वाकांक्षी रेल्वेच्या उद्घाटनामुळे अकोल्यासह विदर्भ आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांना थेट ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांशी जोडले जाणार आहे.

खासदार अनुप धोत्रेंच्या हस्ते ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे स्वागत
अकोला स्थानकावर या बहुप्रतिक्षित ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ला शनिवारी रात्री हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल यांनी अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. त्यांच्यासह अकोला रेल्वे स्थानक व्यवस्थापक, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, डीआरयूसीसी सदस्य, अकोला रेल्वे सल्लागार समिती सदस्य, आरपीएफ, जीआरपीएफ जवान आणि मोठ्या संख्येने अकोल्यातील नागरिक उपस्थित होते. या एक्सप्रेसने प्रवाशांना एक नवा आणि आरामदायक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

प्रवासाचा वेळ आणि मार्ग
‘अमृत भारत एक्स्प्रेस’ (गाडी क्र. 19021/19022) ही साप्ताहिक असणार आहे.

उधना ते ब्रह्मपूर (गाडी क्र. 19021): ही गाडी दर रविवारी उधना येथून सकाळी 07:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:55 वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. ही सेवा 5 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. अकोला स्थानकावर रविवारी दुपारी 03:25 वाजता येईल. 
 
ब्रह्मपूर ते उधना (गाडी क्र. 19022): ही गाडी दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री 11:45 वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी 08:45 वाजता उधना येथे पोहोचेल. ही सेवा 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. अकोला स्थानकावर मंगळवारी रात्री 11:07 वाजता येईल. 

महाराष्ट्रासह ‘या’ महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा
उधना-ब्रह्मपूर ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ मार्गावर अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. महाराष्ट्रात ही गाडी उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमलनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या स्थानकांवर थांबेल. तसेच, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, टिटलागढ, रायगडा, विजयनगरम्, श्रीकाकुलम रोड आणि पलासा यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही ही एक्सप्रेस प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

आधुनिक सुविधा आणि सुरक्षितता
‘अमृत भारत एक्स्प्रेस’ ही विशेषतः सामान्य आणि स्लीपर श्रेणीतील प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

 कोच रचना: या गाडीत 8 स्लीपर कोच, 11 जनरल (सामान्य), १ पेन्ट्री कार कोचचा समावेश आहे.

 क्षमता आणि वेग: 1,800 हून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी ही गाडी 130 किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता ठेवते.

 सुरक्षितता: प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय आहे, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल.

या एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW