डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन

अकोला : जागतिक हवामान बदलाच्या तथा व्यावसायिक स्पर्धेच्या या कालखंडात आमचा शेतकरी बांधव अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विद्यापीठ, अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संलग्निक संस्थांचे संयुक्त विद्यमातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन दिनांक 20, 21 व 22 सप्टेंबर 2025 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.

यंदाच्या शिवार फेरीत प्रगत कृषी तंत्रज्ञान विषयक माहिती तर मिळणार आहेच, शिवाय विद्यापीठाचे संपूर्ण संशोधन प्रक्षेत्र तीनही दिवस प्रत्यक्ष अवलोकनासाठी शेतकरी बांधवांना खुले राहणार असून पीकनिहाय-तंत्रज्ञाननिहाय संशोधक शास्त्रज्ञांकडून माहिती तर मिळणार आहेत सोबतच आपल्या मनातील शंकांचे समाधान देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेसह यांत्रिकीकरणाच्या या कालखंडात आता शेतकरी बंधू-भगिनींना व्यावसायिक शेतीचे तंत्रज्ञान शिकावेच लागणार असून त्याचा प्रत्यक्ष वापर केल्यानेच आर्थिक संपन्नता येत शाश्वत शेती व संपन्न शेतकरी ही संकल्पना कृतीत येणार आहे.

यंदाच्या शिवार फेरीत आपणास तेलबिया पिके जसे सूर्यफूल, भुईमूग, नगदी पिके जसे कापूस, सोयाबीन, डाळवर्गीय पिके जसे तूर, मूग, उडीद, तृणधान्य पिके जसे ज्वारी, बाजरी, मका, भरड धान्ये जसे कुटकी, राळं, फळपिके जसे आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, ड्रॅगन फ्रुट, चिकू, जांभूळ, अंजीर, पेरू, भाजीपाला पिके जसे वांगी, कांदा, लसूण, हळद, मिरची, शोभीवंत फुलपिके जसे गुलाब, शेवंती, निशिगंधा, सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी, शेतीपयोगी यंत्र- अवजारे, जातिवंत गोवंशाचा संवर्धन प्रकल्प,अत्याधुनिक मोकळ्या पद्धतीचा गोठा, चारा पिके, व्यावसायिक शेळीपालन, कोंबडी पालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, एकात्मिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प, रेशीम शेती, सुगंधी व औषधी वनस्पती उद्यान, व्यावसायिक उद्यानिकी नर्सरीं, कोरडवाहू शेती तंत्रज्ञान, एकात्मिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प आदीचे प्रत्यक्ष अवलोकन करता येणार आहे.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यंदाच्या शिवाय फेरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी 20 एकर क्षेत्रावर खरीप पिकांच्या विविध जातींचे तथा तंत्रज्ञानांचे 300 हून अधिक जिवंत प्रात्यक्षिके साकारण्यात आले असून येथे एकाच ठिकाणी विविध विद्यापीठांद्वारे तथा खाजगी संस्था द्वारे संशोधित विविध पिकांच्या जाती,लागवड तंत्रज्ञान पाहावयास उपलब्ध असणार आहे.
अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने यंदाच्या शिवाय फेरीचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून शिवार फेरीला सुरुवात होणार आहे.
गतकाही दिवसांपासून सततधार बरसलेल्या पावसानंतर उद्भवलेल्या जोखमीच्या परिस्थितीत देखील आपणासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने आणि त्यांचे सर्व सहकारी शिवार फेरीचे आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
आपण सहकुटुंब, सहपरिवार या अतिशय महत्त्वाकांक्षी शिवार फेरीला अवश्य भेट देऊन शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघावे व इतरांना देखील याविषयी माहिती द्यावी असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला तथा कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW