जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. २९ : जिल्ह्यात विकासकामांना चालना देण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे, जिल्हा समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. एम. जी. वाठ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून प्राप्त निधीनुसार कामांना चालना द्यावी. नियोजनानुसार ३० टक्के निधी प्राप्त आहे. पुढील १० दिवसांनी आपण या कामांचा पुन्हा आढावा घेणार असून, सर्व विभागांनी आपली मान्यतांची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. वारंवार फॉलोअप घेण्याची गरज पडू नये. आर्थिक वर्ष संपताना ऐनवेळी मान्यतांअभावी कामे रखडणे आणि निधी परत जाणे असे कदापि घडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, शाळा, पशुसंवर्धन योजना, क्रीडा योजना, रूग्णालय बांधकाम व दुरुस्ती, सामाजिक न्याय योजना, महापालिका, नगरपालिकांतर्गत कामे आदी विविध बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW