अकोला, दि. १९ : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरे, शेतीक्षेत्राचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. प्रत्येक नुकसानाची व्यवस्थित नोंद घ्यावी. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील कंझारा, लाखपुरी, रसूलपूर आदी गावांना भेट देऊन तेथील शेती क्षेत्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तहसीलदार शिल्पा बोबडे, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिका-यांनी ठिकठिकाणी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्रात, शेतात पोहोचून पिकांची पाहणी केली, तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले व पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याचे निर्देश यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, शेतपीक, फळ बागांचे जिथे जिथे नुकसान झाले, त्या सर्व बाबींची तपशीलवार नोंद घेऊन नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत व त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने सतर्कता बाळगावी व यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.