रविवारीही ठिकठिकाणी विशेष शिबिर
ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २४ : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्यासाठी प्रत्येक तालुका, मनपा व नगरपालिका स्तरावर आज आयोजिण्यात आलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उद्या
रविवारी (२५ ऑगस्ट) ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराद्वारे विशेष शिबिरांच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने गरजूंच्या अर्जांची पूर्तता करून घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
सर्व तालुका, मनपा, नप स्तरावर शिबिराच्या कार्यवाहीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नप मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गृहपाल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिबिरांचे आयोजन करून योजनेचे अर्ज ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत परिपूर्ण भरून घेण्यात येत आहेत. अर्जदाराला आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य अधिकारी शिबिरात उपस्थित आहेत. अकोला मनपा स्तरावरही नागरी आरोग्य केंद्र व आयुष्यमान आरोग्य मंदिर, तसेच जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ व्हावा असे प्रयत्न होत आहेत.
योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी तीन हजार रु. खात्यात प्राप्त होतात.
राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात.
त्यातून ज्येष्ठांना चष्मा, ट्रायपॉड, स्टीक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायीकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करता येतील, तसेच नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची २ छायाचित्रे, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा २ लाख), आवश्यक साहित्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारसपत्र आवश्यक आहेत.