- जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे संबंधित विभागांना निर्देश
भाविकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन
अकोला, दि. २४ : वेधशाळेकडून 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम येथे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना अमलात आणाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच भाविकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, तसेच अकोला व अकोट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वेधशाळेकडून 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दगडपारवा, काटेपूर्णा व पूर्णा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
काही भाविक यात्रेदरम्यान नदीपात्रात आवश्यक ती खबरदारी न घेता अनाठायी धाडस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने 25 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी शोध व बचाव पथक पूर्णा नदी, गांधीग्राम येथे उपस्थित राहील.
त्याचप्रमाणे, विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक कार्यकर्ते यांची मदत घ्यावी. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल अशी सर्व यंत्रणा गांधीग्राममध्ये उपस्थित ठेवावी. यात्रेदरम्यान कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करावी, असे निर्देश अकोला व अकोट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शोध व बचाव पथक
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३ आपत्कालीन शोध व सुटका पथके नेमण्यात आली असून, त्यामधे ३० आपदा मित्र रक्षक असून २ बोटी तैनात ठेवल्या आहेत.
चोख बंदोबस्त ठेवा
अकोला ते गांधीग्रामपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. यात्रेदरम्यान प्रतिबंधक आदेश आवश्यक असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून तो प्राप्त करून घ्यावा. आपत्ती व्यवस्थापन पथकाशी नेहमीच समन्वय ठेवून यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हा पोलिसांना करण्यात आली आहे.
वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका ठेवा
महापालिकेकडून अकोला ते गांधीग्रामपर्यंत प्रकाशव्यवस्था ठेवावी. आवश्यकतेनुसार जनरेटर उपलब्ध ठेवावीत अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यासह उपस्थित रहावे. जिल्हा परिषदेकडून कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम येथे स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी. आरोग्य पथक व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.