प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य

जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. २२ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यातील 858 घराच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. वापराएवढी वीजनिर्मिती होत असल्याने त्यांचे वीज देयक शून्यापर्यंत कमी झाले आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीची बैठक गुरूवारी त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. सीईओ बी. वैष्णवी, ‘महावितरण’च्या अधिक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, कार्यकारी अभियंते ज्ञानेश पानपाटील, जयंत पैकीने, गोरक्षनाथ सपकाळे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की,  ऊर्जा क्षेत्रात महत्वाचा विधायक बदल घडविणारी ही योजना आहे. जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळावा. योजनेत ‘मॉडेल व्हिलेज’च्या दृष्टीने विविध गावांची पाहणी करावी. जिल्ह्यात योजना व्यापकपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणा-या नागरिकांना प्रति किलोवॅट ३० हजार याप्रमाणे प्रथम दोन किलो वॅटसाठी ६० हजार आणि तिस-या किलोवॅटसाठी १८ हजार असे एकुण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते, असे श्रीमती शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महावितरण’कडून गावोगावी जाऊन पथनाट्य, बॅनर्स, फलक आदी माध्यमातून योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणा-या ग्राहकांना सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे. असल्याचेही त्या म्हणाल्या. महावितरणच्या पत्रकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW