- जिल्हाधिकारी अजित कुंभार
कावड यात्रेबाबत प्रशासन व मंडळांच्या प्रतिनिधींत चर्चा
अकोला, दि. 2 : जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा हा अदभूत उत्सव असून या यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील. या उत्सवाचे पावित्र्य टिकविण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. पथदिवे, ठिकठिकाणी पेयजल, स्वच्छतागृहे, रूग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके, रस्त्यांची दुरूस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जातील. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये. यासाठी मंडळांनी सहकार्य करावे.
पोलीस अधिक्षक श्री. सिंग म्हणाले की, सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे. पोलीसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल. भाविकांना आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. यात्रेत मंडळानेही प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य करावे.
महापालिका आयुक्त श्री. लहाने म्हणाले की, पालखी मार्गावर हॅलोजन दिवे, स्वच्छता, प्रशासनगृहे आदी सुविधा निर्माण केल्या जातील. विविध बाबी लक्षात घेऊन तशी पथके महापालिकेतर्फे निर्माण करण्यात येतील. अकोट, बाळापूर येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली. अनेक मंडळांचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.