अकोला, दि. 25 : पीक विमा कंपनीबाबत प्राप्त तक्रारी पाहता त्याचे गांभीर्य ओळखून सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत जिल्हाधिकारी स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जि. प. सीईओ बी. वैष्णवी व विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
नुकसानीचे पंचनामे करताना योग्य प्रक्रिया राबवली गेली नाही. विमा कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले नाही. पंचनाम्याच्या प्रती सादर केल्या नाहीत. अशा अनेक तक्रारी पीक विमा कंपनीबाबत आल्या आहेत. याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.
आरोग्य विभागांशी संबंधित विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. रूग्णालयात औषधसाठा उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी आहेत. पावसाळा पाहता सर्व औषधसाठा तत्काळ उपलब्ध करून घ्यावा. मूर्तिजापूर येथील रूग्णालयात डायलिसिस सेंटरसाठी सिटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी तातडीने प्रस्ताव द्यावा. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीसाठी रस्ते खणले जातात. त्याची दुरूस्ती त्याचवेळी होणे आवश्यक असते. मूर्तिजापूर तालुक्यात अशा रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. हे रस्ते दि. 5 ऑगस्टपूर्वी दुरुस्त करावेत व तसा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.