जिल्हाधिका-यांसह विविध अधिकारी व कर्मचा-यांनी घेतली पंचप्राण शपथ
‘माझी माती माझा देश’ अभियानात महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी, घरोघर माती गोळा करण्यात येत आहे. उपक्रमात आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निवासस्थानाहून माती गोळा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिका-यांसह विविध अधिकारी व कर्मचा-यांनी पंचप्राण शपथ घेतली.
अमृत कलश यात्रेत पोलीस अधिक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या निवासस्थानीही माती गोळा करण्यात आली. जिल्हाधिकारी निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजित कुंभार, समन्वय अधिकारी गजानन महल्ले, विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हे अभियान देशासाठी जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांना समर्पित आहे. अभियानात शहरातील प्रत्येक परिसरातील नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येत आहे. ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. त्यानंतर हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी महल्ले यांनी दिली.