जिल्ह्यात 14 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक; आचारसंहिता लागू
डिसेंबरमध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
अकोला, दि. 4 : डिसेंबरमध्ये मुदत संपणा-या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तसेच विविध कारणांनी सदस्य किंवा सरपंच पदे रिक्त झालेल्या 40 ग्रामपंचायतींत पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केला.
निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व रिक्त जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार तहसीलदारांकडून दि. 6 ऑक्टोबरला निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची वेळ दि. 16 ते दि. 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते दुपारी 3 वा. दरम्यान आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. सुरू होईल. नामनिर्देशनपत्रे दि. 25 ऑक्टोबर रोजी दु. 3 पर्यंत मागे घेता येतील. त्यानंतर दि. 25 ऑक्टोबर रोजी दु. 3 वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील, तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
आवश्यक असल्यास दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी व निकाल दि. 6 नोव्हेंबर रोजी घोषित होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना दि. 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
जिल्ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 56 सदस्य व 3 थेट सरपंच अशा एकूण 59 पदांची पोटनिवडणूक होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणाऱ्या 14 ग्रामपंचायतींची 14 सरपंच पदे व 111 सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होईल. त्यात तेल्हारा तालुक्यातील 3, मूर्तिजापूर तालुक्यातील 2, अकोला तालुक्यातील 4, बार्शीटाकळी 4 व पातूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. रिक्त पदांमुळे अकोट तालुक्यात बांबर्डा, अकोला तालुक्यातील भौरद व पातूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होईल.