अकोला, दि. 3 : ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी), इतर लाभ व आवश्यक माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर दिव्यांग सेवा समिती निर्माण करावी, असे निर्देश ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पोलीस लॉन येथे झाला, त्यानंतर श्री. कडू यांनी नियोजनभवनात विविध विभागांच्या अधिका-यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अभियानाचे अध्यक्ष श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात जाण्याची गरज पडू नये यासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर विविध लाभ मिळवून दिले पाहिजेत. अशा कामकाजासाठी केंद्रांवर दिव्यांग सेवा समिती निर्माण करावी. यादृष्टीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. जिल्हा प्रशासनानेही ‘ॲक्शन प्लॅन’ करून या कामाला दिशा व गती द्यावी.
ते पुढे म्हणाले की, विविध आवास योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना घरे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. स्वच्छतागृहांची सुविधाही उभारून द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी आवश्यक कामे राबवावीत. दिव्यांगभवनासाठी 12 कोटी 50 लक्ष रू. निधी अपेक्षित आहे. सध्या 6 कोटी 50 लक्ष रू. निधीची प्रशासकीय मान्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून उर्वरित निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करावेत व या अभियानात राज्यात जिल्ह्याची कामगिरी पथदर्शी ठरण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.